|| छत्रपती सुत्र ||
सुरतेची लुट का सुरतेवर स्वारी ?
"शिवरायांनी सुरतेची लुट करुन औरंगजेबाला बेसुरत केले" असे ज्या घटनेचे वर्णन केले जाते त्या घटनेला ६ जानेवारी २०१४ ला साडेतिनशे वर्ष पुर्ण झाली.मराठ्यांच्या इतिहासातील आणि वर्तमानातीलसुध्दा ही एक गौरवास्पद बाब आहे.या घटनेनंतर शिवरायांच्या शत्रुंनी या घटनेचा इतका धसका घेतला की त्याचे वर्णन इंग्रजी पत्रांमध्ये "Surat Trembles At The Name Of Sevagee" (अर्थ-शिवरायांच्या नावानेच सुरत थरथर कापते.) अशा पध्दतीने केल्याचे पहायला मिळते.शिवरायांना जगभर पोचवणाऱ्या अनेक प्रसंगांपैकी हा एक प्रसंग.शिवरायांची राजनिती,युध्दनिती,पराक्रमाचा एक उत्कृष्ट नमुना..
या घटनेची पार्श्वभूमी अशी की,शाहीस्तेखान पुण्याला लालमहाल (आताचा शनिवारवाडा ; अधिक माहितीसाठी वाचा प्रा.मा.म.देशमुख लिखीत शनिवारवाडा हाच खरा लालमहाल ) मध्ये आपल्या विशाल सैन्याबरोबर मुक्कामाला असताना त्याने इथल्या गोरगरीब रयतेला प्रचंड लुटले होते.प्रजेकडुन अमाप लुट केली होती.तेव्हा शिवरायांनी स्वतः ३ एप्रिल १६६३ ला शाहीस्तेखानावर हल्ला करुन त्याला आपली चुणुक दाखवली.शिवरायांच्या आक्रमकतेमुळे भयभीत झालेला शाहीस्तेखान तीन दिवसात आपल्या फौजेसह पुणे सोडुन पाय लावून पळाला.जाताना केलेली लुट सोबत घेउन गेला.शाहीस्तेखानाने स्वराज्याची अपरिमीत हानी केली.स्वराज्याचा डोलारा पुन्हा उभा राहणे आवश्यक होते.मार्ग सापडत नव्हता.राजेंनी बहीर्जी नाईकांवर आर्थिक स्त्रोत शोधण्याची जबाबदारी सोपवली.बहीर्जी नाईकांनी आपली जबाबदारी पार पाडली."राजे,सुरत मारलियाने अगणित द्रव्य गवसेल" ही गोष्ट त्यांनी राजेंना सांगितली.राजेंनाही पटले.सुरत ही औरंगजेबाच्या साम्राज्यातील प्रमुख बाजारपेठ.थोडक्यात सांगायचे तर औरंगजेबाची तिजोरीच..
मग राजेंनी आपला मोर्चा सुरतेकडे वळवला.बहीर्जींनी नाईकांनी एखाद्या Sattelite Cammera प्रमाणे सुरतेच्या गल्लीबोळापासून सर्व माहीती गोळा करुन राजेंना आणून दिली.या माहितीवरुन पुढील योजना आखल्या गेल्या.ठरल्याप्रमाणे सर्व योजना पार पडल्या.राजांना या मोहीमेतुन भरपुर खजीना मिळाला.या घटनेने मोगलशाहीचे नाक कापले गेले.शिवराय जगप्रसिध्द झाले.अशा प्रकारे या घटनेची पार्श्वभूमी आहे.
परंतु...
आता हा "परंतु" कशासाठी ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल,पडलाच पाहीजे.त्याचे उत्तर मिळावे अशी अपेक्षा पण असेल तुमची तर ती रास्त आहे.आपण शिवरायांवर प्रेम करणारे मावळे आहोत.शिवरायांचा इतिहास वाचताना,ऐकताना आपण कधीकधी खुप भावनिक होतो.या भावनिकपणात नकळत गाफील राहीले जाऊन शत्रुच्या चालींना फसले जातो.ते कसे हे सांगण्यासाठीच हा "परंतु"...
मित्रांनो,वर सांगितल्याप्रमाणे सुरत ही औरंगजेबाची तिजोरीच होती.या सुरतेत असणारे सावकार खुप मुजोर आणि माजगे होते.त्या सावकारांनी गोरगरीब जनतेची संपत्ती लुबाडली होती.रयतेच्या कष्टावर हे सावकार आपल्या श्रीमंतीचे मजले चढवीत होते.शिवरायांना या गोष्टीची पूर्ण माहिती होती.त्यांना धडा शिकवायचा ही शिवरायांची खुप दिवसांची इच्छा होती.पण योग्य संधी मिळत नव्हती.ती संधी ६ जानेवारी १६६४ ला मिळाली.त्या संधीचा त्यांनी योग्य उपयोग करुन घेतला.
खरं सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांनी सुरत लुटली या म्हणण्याला काहीच अर्थ नाही.कारण शिवरायांनी सुरतेतील गोरगरीब जनतेला,धर्मस्थळांना अजिबात त्रास दिला नाही.उलट जे मूजोर,मस्तवाल सावकार होते,ज्यांनी गोरगरीबांवर अन्याय करुन संपत्ती लुबाडली होती ती संपत्ती त्या माजग्या सावकारांकडुन सोडवुन आणली.तीसुध्दा त्या सावकारांना इशारावजा पत्रातुन कळवून.त्यांनी त्या संपत्तीचा उपयोग स्वतः साठी न करता स्वराज्यासाठी केला.ती संपत्ती त्यांनी सिंधुदुर्ग च्या संपुर्ण बांधकामासाठी वापरली.
ज्यांनी कोणी हा शब्दप्रयोग रुढ केला त्यांनी खुप मोठी चुक केली आहे.लेखणीबहाद्दरांनी कळत नकळत या घटनेचे वर्णन "सुरतेची लुट" असे करुन एकप्रकारे शिवरायांना "लुटारु" ठरवले आहे,मग त्याच पावलावर पाऊल ठेऊन बाकीच्यांनी पण तोच इतिहास रुढ केला.जवाहरलाल नेहरुने त्याच्या पुस्तकात शिवरायांना लुटारुच ठरवले.असे अनेक दाखले देता येतील.पाठ्यपुस्तकांनी सुध्दा हाच इतिहास सर्वश्रुत केला.
मुळात सुरतेची लुट हा शब्दप्रयोगच चुकीचा आहे.शिवरायांनी सुरतेची लुट केली नसून सुरतेवर स्वारी करुन तेथील मुजोर सावकारांनी गोरगरीब जनतेचे लुटलेले धन सोडवून आणले.
चांगल्या प्रवृत्तीने वाईट प्रवृत्तीला चांगल्यासाठी कार्यासाठी आर्थिक नुकसान दिले तर त्याला लुट म्हणता येईल काय ?
माझे म्हणणे एवढेच आहे की सुरतेची लुट याऐवजी सुरतेवर स्वारी हा शब्दप्रयोग वापरणे योग्य होईल.
मी वर उपसथित केलेल्या माझ्या "परंतु" मागे हे स्पष्टीकरण आहे.
तुम्हाला याबद्दल काय वाटते ?
जय जिजाऊ जय शिवराय
===आपलाच,अनिल माने (कुरवली)===
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here