वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशासाठी हसत हसत फाशी गेलेल्या ज्या भगत सिंगला आजही या देशात काही महाभाग अतिरेकी मानतात, तो भगत सिंग एक लेखक, एक पत्रकार, एक काव्यरसिक, एक प्रतिभावंत, एक समाजवेत्ता, एक क्रांतिकारक, एक परखड तत्त्वज्ञानी, एक सहिष्णू विचारवंत, एक द्रष्टा, एक निग्रही देशभक्त, एक उत्तम वक्ता अशी अनेक रुपे असलेला एक महायोगी होता हे किती लोकांना माहित आहे ?
इतक्या कमी वयात त्याने शेकडो पुस्तकांचे वाचन केले होते. ऑस्कर वाइल्ड्चे 'वीरा-दी निहिलिस्ट', क्रोपोटकिनचे 'मेमॉयर्स', मॅझिनी व गॅरिबाल्डी यांचे चरित्र, वॉल्टेर, रुसो,व बकुनिनचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची नामावली फार मोठी होती. त्या यादीत विक्टर ह्युगोची'ला मिझरेबल', हॉलकेनचे 'इटर्नल सिटी', अप्टन सिंक्लेअरची 'क्राय फॉर जस्टिस', रॉस्पिनची 'व्हॉट नेव्हर हॅपन्ड', गॉर्कीची 'मदर' ह्या कादंबऱ्याही होत्या. देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांची चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक ग्रंथ त्यांनी अभ्यासले होते. साम्यवादी समाजरचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडविण्यासाठी त्यांनी लेनीन, मार्क्स, टॉलस्टोय, गॉर्की, बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते. पत्रकार म्हणून त्यांनी 'वीर अर्जुन', 'प्रताप', इत्यादी दैनिकांत काम केले होते. पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला. हिस्टरी ऑफ रीवोल्युशनरी मुव्हमेंट इन इंडिया, दि आयडियल ऑफ सोशालीझाम, ऑटोबायोग्राफी, आणि यात द डोअर ऑफ डेथ अशी चार पुस्तक त्यांनी लिहिली होती. ती आता उपलब्ध नाहीत. ब्रिटीशानी कदाचित ती नष्ट केली असावीत किंवा लाहोर पाकिस्तानात गेल्यावर तिकडे राहिली त्याचा सुगावा आजतागायत लागलेला नाही.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना ज्यांना ब्रिटीशानी बर्फाच्या लादीवर झोपवलं, खिळ्यांच्या बुटांनी लाथा मारल्या, लाहोरच्या कडक उन्हाळ्यात मुद्दाम चहुंबाजूना शेगड्या पेटवून बसवला गेलं. अंगावर घाण टाकली गेली. अशा भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेवने आपल्या प्राणांची आहुती देवूनही आपल्या देशाने मात्र त्यांची घोर उपेक्षाच केली.
माझी त्या महान क्रांतीकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली.शहीद
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here