समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥2॥
तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥
2
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥
तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥
3
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥
तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥
4
राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥
कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥2॥
कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥
सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥4॥
5
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥
तुका ह्मणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥
6
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥4॥
तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥5॥
॥6॥
विराण्या - अभंग 25 7
वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥
सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥2॥
नाइकें वचन बोलतां या लोकां । ह्मणे जालों तुका हरिरता ॥3॥
8
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकलियें ॥1॥
रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥2॥
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका ह्मणे ॥3॥
9
हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥1॥
घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥2॥
बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥3॥
10
नाहीं काम माझें काज तुह्मांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥1॥
व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥2॥
न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका ह्मणे॥3॥
11
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥1॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥2॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका ह्मणे कानीं बहिरी जालें ॥3॥
12
न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका ह्मणे खरी केली मात ॥3॥
13
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥1॥ बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥
14
क्षणभरी आह्मी सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥1॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥2॥ तुका ह्मणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥3॥
15
आह्मां आह्मी आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥1॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥2॥ तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥3॥
16
सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥1॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥2॥ तुका ह्मणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥3॥
17
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥1॥ नारायणा आह्मां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभािळली ॥2॥ तुका ह्मणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥3॥
18
हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥1॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आह्मी नारायण एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥3॥
19
मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥1॥ न साहवे तुह्मां या जनाची कूट । बोलती वाइऩट ओखटें तें ॥2॥ तुका ह्मणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥3॥
20
शिकविलें तुह्मीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥1॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥3॥
21
सांगतों तें तुह्मीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥1॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥2॥ तुका ह्मणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥3॥
22
आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥1॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥2॥ तुका ह्मणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥3॥
23
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥1॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥2॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका ह्मणे काई लाजों आतां ॥3॥
24
मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥1॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥3॥
25
परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥1॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥2॥ तुका ह्मणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥3॥
26
अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥1॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥2॥ तुका ह्मणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥3॥
27
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आह्मां तैशा ॥1॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥2॥ तुका ह्मणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥3॥
28
बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥1॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥3॥
29
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥1॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥2॥ तुका ह्मणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥3॥
30
न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥1॥ मानेल त्या तुह्मी अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥3॥
31
न बोलतां तुह्मां कळों न ये गुज । ह्मणउनी लाज सांडियेली ॥1॥ आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥3॥
॥25॥
32
नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥1॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥2॥ तुका ह्मणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥3॥
33
सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥1॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥2॥ तुका ह्मणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥3॥
34
आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥1॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥3॥
35
अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥
36 सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तुप पथ्या ॥4॥ दो प्रहरा मज लहरी येती । शुद्ध नाही पडे सुपती॥5॥ नीज न यें घाली फुलें । जवळी न साहती मुलें॥6॥ अंगी चंदन लाविते भाळी । सदा शूळ माझे कपाळी॥7॥ हाड गळोनी आले मांस । माझें दुख: तुम्हा नेणवे कैसे॥8॥ तुका म्हणे जिता गाढव मेला । मेलियावरी नरका गेला ॥9॥
37 पावलें पावलें तुझें आम्हा सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ जेथें तेथें तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेद मतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशी देऊं ॥2॥ तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥
38 वंदू चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥1॥ अमुप हे गाठी बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ॥ध्रु.॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तने गोविंदाच्या ॥2॥ जन्म मरणाच्या खुंटतील खेपा । होईल सोपा सिद्ध पंथ ॥3॥ गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं घेत माग आम्ही ॥4॥ तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया ॥5॥
39 जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥1॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलो निराळा । पासूनि सकळा अवघ्या दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावे । हें तों देवें बरें शिकविलें ॥2॥ दुस-यातें आम्ही नाही आतळत । जाणोनि संकेत उभा असें ॥3॥ येथें कोणी काही न धरावी शंका मज चाड एका भोजनाची ॥4॥ लाचावला तुका मारीतसे झड ! पुरविलें कोड नारायणें ॥5॥
40 देवाच्या प्रसादे करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी तें ॥1॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट । नका मानू वीट ब्रह्मरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरते वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथे ॥2॥ एच्छादानी येथें वळला समर्थ । अवघे चि आर्त पुरवितो ॥3॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥4॥ तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगाते निरुपम ॥5॥
41 अवगुणांचे हाती । आहे अवघी फजीती ॥1॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष तांब्या वाटी । भरली लावूं नये होटीं ॥2॥ तुका म्हणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥3॥
42 हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना । कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचें फुकासाठी । ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंती । तुका म्हणे बरा । लाभ काय तो विचारा ।
43 धर्माची तूं मूर्ती । पाप-पुण्य तुझे हाती । मज सोडवी दातारा । कर्मापासोनी दुस्तरा ॥ध्रु.॥ करीसी अंगिकार । तरी काय माझा भार । जीवींच्या जीवना । तुका म्हणे नारायणा ।
44 ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आम्ही भले शरणागत ।।1।। कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाणी ।।ध्रु।। कामधेनूचिया क्षीरा पार नाही ।इच्छेचिये वाही वरुषावे ।।2।। बैसलिये ठायीं लगलें भरतें । त्रिपुटी वरतें भेदी ऐसें ।।3।। हरि नाही आम्हां विष्णुदासां जगीं । नारायण अंगी विसावला ।।4।। तुका म्हणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता क़ोण राहत राहों ।।5।।
दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ।। आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ।।1।। इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ।। पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ।।ध्रु।। देह आधी काय खरा । देहसंबंधपसारा ।। बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ।।2।। तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ।। आहेसि तूं आगा । अंगी दोळे उघडी ।।3।।
46 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।1।। अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ।।ध्रु।। कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।2।। तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ।।3।।
47 आम्ही जरी आस । जालों टाकोनी उदास ।।1।। आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ।।ध्रु।। भलते ठायीं पडों । देह तुरंगी हा चढो ।।2।। तुमचं तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ।।3।। गेलेमानामान । सुखदु:खाचें खंडन ।।4।। तुका म्हणे चिती । नाहीं वागवीत खंती ।।5।।
48 निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ।।1।। मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ।।ध्रु।। देहभोग भोगें घडे । जें जें जोडे तें बरें ।।2।। अवघें पावे नारायणी । जनार्दनीं तुक्याचें ।।3।।
49 जन विजन जालें आम्हां । विठ्ठल नामा प्रमाणें ।।1।। पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ।।ध्रु।। वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ।।2।। आठव नाहीं सुखदु:खा । नाचे तुका कौतुकें ।।3।।
50 हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ।।1।। तोचिमोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।ध्रु।। मोहरा होय तोचि अंगे । सूत न जळे ज्याचे संगे ।।2।। तुका म्हणे तोचि संत । सिसी जगाचे आघात ।।3।।
51
आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥1॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥3॥
52
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥1॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टािळलें निमित्त । फार थोडें घात हित ॥2॥ यावें कामावरी । तुका ह्मणे नाहीं उरी ॥3॥
53
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुिद्ध । निर्मळ स्फटिक जैसा ॥1॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥ तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥2॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका ह्मणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥3॥
54
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥1॥ ह्मणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥2॥ तुका ह्मणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥3॥
55
महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥1॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥2॥ ज्याचा संग चित्तीं । तुका ह्मणे तो त्या याती ॥3॥
56
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥1॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥ नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥2॥ शेजारणीच्या गेली रागें ।कुतयांनी घर भरिलें मागें ॥3॥ पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥4॥ तुका ह्मणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥5॥
57
मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥1॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥2॥ तुका ह्मणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥3॥
58
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥1॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥2॥ नेणे शब्द पर । तुका ह्मणे परउपकार ॥3॥
59
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥1॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥2॥ जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥3॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥4॥ तुका ह्मणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥5॥
60
आह्मी सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥1॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥2॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोणगुरें वासरें ॥3॥ जाली सकळ नििंश्चती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥4॥ तुका ह्मणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥5॥
61
पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी ह्मणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥3॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥ तुका ह्मणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥5॥
62
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥1॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥2॥ तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥3॥
63
चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥1॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥2॥ तुका ह्मणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥3॥
64
परिमळ ह्मूण चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥1॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥2॥ कर्मफळ ह्मणुनी इच्छूं नये काम । तुका ह्मणे वर्म दावूं लोकां ॥3॥
65
माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥1॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥2॥ तुका ह्मणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥3॥
66
दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥1॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे। आगी उठे तेथूनी ॥2॥ तुका ह्मणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥3॥
67
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपाजिऩती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥1॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥2॥ तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥3॥
68
पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥1॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥3॥
No comments:
Post a Comment
Your Review Comment Here