Wikipedia

Search results

Tuesday, 4 February 2014

राजे कविता

राजे...........

राजे असा कंटाळा करून चालणार नाही
माझ्याशिवाय तुमच्याशी
खरे कुणीच बोलणार नाही
’गाईड’होण्याची संधीही
मी कशाला हुकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

सुरूवात शिवनेरीपासून?
की,रायगडापासून करायची?
उलटी की सुलटी?
कोणती मळवाट धरायची?
असे कोड्यामध्ये पडू नका,
कुणालाच उपदेश नको,
"आपापसात लढू नका"
तेव्हाही पटले नाही,
आत्ताही पटणार नाही.
मरतील पण सवयीपासून
मागे कुणी हटणार नाही.
म्हातारीच्या मरणाने
काळ बघा कसा सोकावतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो..

शिवबा घडवायचा असेल तर
त्यासाठी जिजाऊ असली पाहिजे
शहाजीच्या मनामध्ये
ही आस ठसली पाहिजे.
पण आजकाल हे सारे
घडताना दिसत नाही
तुमचे चरित्र वाचायला गोड वाटते
पण पचनी पडताना दिसत नाही.
पोकळ मराठी बाणा तर
बघा स्वत:लच फ़सवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ते बघा नवे देशमुख,
ते बघा नवे देशपांडे,
वतनदारीसाठी टपलेले आहेत
त्यांच्या आतली काळी माणसं
खादीमध्ये लपलेले आहेत.
पराक्रमाला तोड नाही
कर्तुत्वाला जोड नाही
महाराष्ट्राच्या भल्याची
स्वार्थापुढे ओढ नाही
म्हणूनच तर सह्याद्री
आपला माथा झुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

ज्यासाठी जान की ’बाजी’ लावावी
तोच खिंडीमध्ये गाठतो आहे
पिसाळांचा सूर्याजी तर
इथे दर फ़ुटा-फ़ुटाला भेटतो आहे.
"आधी लगीन कोंढाण्याचे"
म्हणण्याची
आज तानाजीत हिंमत नाही
बापजाद्यांच्या पराक्रमांची
आज रायबाला किंमत नाही.
इतिहास राहिला नाही
जो तो सोईप्रमाणे
आज इतिहासाला वाकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

आपलेच आपल्याला लुटायला
लागले
परक्यांची आवश्यकता नाही
परक्यांनीच लुटले पाहिजे
हा काही त्यांचाच मक्ता नाही.
डोळे मिटलेल्या मांजरीचे
सारे नखरे कळत आहेत
मनातल्या मनात शायिस्तेखानाची
बोटे अजून वळवळ्त आहेत.
आपलाच गनिमी कावा
बघा आपल्यालाच कसा चकवतो?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघ प्रतापगड सांगतोय,
इथेच पराक्रम घडला होता.
अफ़जुल्याचा कोथळा
बाहेर पायथ्याशी पडला होता.
अजूनही अफ़जुल्या
तो पराक्रम सांगतो आहे.
आम्ही आमची अक्कल
उगीच वेशीला टांगतो आहे.
मेलेल्यांशी वैर धरून
कुणी अफ़वा इथे पिकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

तो बघा ज्याचा प्रदेश,
तिथेच त्याचा किल्ला आहे.
इष्टप्रधान मंडळाचा
फ़ायदेशिर सल्ला आहे.
ज्याचा त्याचा झेंडा आहे
ज्याची त्याची राजमुद्रा आहे.
सुखी माणूस तोच,
ज्याच्या अंगी खादीचा सदरा आहे.
डोक्यावरून पाणी चाललेय
जो तो आपल्यापुरते चुकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शिवा काशिद,मुरारबाजी,
नेताजी,हिरोजी आणि मदारी
आता भेटाण्याची आशा नाही.
जीवाला जीव देण्याची,
मावळ्यांना आता नशा नाही.
खूप झाल्या सेना,
खूप झाले सेनापती,
सैनिका-सैनिकांची वाटणी आहे.
वाईट वाटण्याचे कारण नाही,
आजच्या राजकारणाची
हीच धाटणी आहे.
निष्ठा दाखवायची खुमखुमी येता
पटकन डिजिटल ब्यानर डकवतो
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

पुरंदरच्या तहाची परंपरा
आजकाल जोरात पाळली जाते.
परस्परांचा फ़ायदा असेल तर
राजकीय लढाईही टाळली जाते.
राजकीय मांडवली झाली की,
पाच वर्षापुरते तरी भागते.
राजे,छाव्याला जामीन ठेवायला,
वाघाचे काळीज लागते.
दुसर्याच्या जळत्या घरासामोर
आज आम्ही आपले कपडे सुकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

शेतकर्यांची अवस्था अशी की,
जसा वेढ्यामध्ये पन्हाळा आहे.
बारा महिने तेरा त्रिकाळ
त्यांच्या आयुष्य़ात उन्हाळा आहे.
राजे,चूकुनही बघू नका
त्यांची अवस्था कशी आहे?
विषासाठी पैसा नसेल तर
घराच्या आढ्याला फ़ाशी आहे.
व्याजाने व्याज वाढत जाते
तरीही विचारतात,
हप्ता का थकवतो ?
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

सरकार म्हणाले शिका,
पोरं इथले शिकले आहेत.
शिक्षणाची दुकाने तर
वढ्या-वघळीला टाकले आहेत.
सिंहगडाखालचा पराक्रम तर
खरोखरच बघण्यासारखा होता.
रेव्ह पार्टीच्या थोबाडावर
उच्चभ्रुपणाचा बुरखा होता.
येतील तसे दिवस
आपला महाराष्ट्र धकवतो.
राजे, चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो...

जसे राजकारणाचे,
तसे साहित्याचेही झाले आहे.
सहकाराला स्वाहाकाराचे
बकासुरी रूप आले आहे.
आया-बहिणींच्या इज्ज्तीची
समस्या तर जटील आहे.
नाक्या-नाक्यावर उभा
जणू रांझ्याचा पाटील आहे.
लोकशाहीचा पाईक मी,

राजे, चला
मी तुम्हाला
तुमचा महाराष्ट्र दाखवतो..
चला ना राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
काय ते तुमचे मावळे होते
जे लढले रयते साठी
अन
काय ते विजयी सोहळे होते जे सजले राजमाते
साठी
पण
आज तुमचाच मावळा
दोन दोन गर्लफ्रेंड वागवतो
अन
कशी
पाण्याची तहाण बिअरवर भागवतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
घरी बाप आत्महत्या करुन मरतो
तरी
तुमचा मावळा दारु
मटनाच्या पार्टीसाठी झुरतो
राजकारण्यांची धुनी भांडी करतांना यांचा आत्मा तरी कुठं
दुखावतो
बघा राजे
तुमचा मावळा स्वाभिमानाच्या नावाखाली मान
झुकवतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
भगव्याच्या नावाखाली खासदार आमदार
आज कैक झाले
मावळे म्हणवतात आता त्यांचे चेले
त्यांचाही डोळा आता पक्षाचा झेंडा पाहुनच
सुखावतो
म्हणुन
सह्यांद्रीच्या कड्याकडे हिमालय डोळे वर करुन
रोखावतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
रयतेच्या मतासाठी दारात येऊन जे भिक
मागतात
तेच पुढची पाच वर्ष मग रयतेच्याच डोक्यावर
नाचतात
गाडी झाली बंगला झाला
तरी
त्यांना पैशाचा माज सोकावतो
ईथे
राजकारण्यांच्या कृपेने भ्रष्टाचार
कसा फोफावतो
चला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो
विसरले परंपरा
अन
पराक्रमाची कुठे आता भाषा नाही
तुमच्या मावळ्यांना ईतिहासाची आता ती नशा नाही
वर्गनीच्या पैशाने एकदा मिरवणुन काढुन उगाच
फुशारकी मिरवतो
सह्यांद्रीच्या कड्यावर
फिरणारा आता पबमध्ये मस्ती जिरवतो
ला न...
राजे
तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो

No comments:

Post a Comment

Your Review Comment Here